SEEDBAO

मुख्यपृष्ठउपयुक्त साधनं › वॉलेट सुरक्षा तपासणी

वॉलेट सुरक्षा तपासणी

शेवटचा बदल: 17 जुलै 2026SEEDBAO संपादकीय

ही यादी एकच प्रश्न विचारते: आजच काहीतरी घडलं — मोबाइल हरवला, «बायनान्स सपोर्ट» म्हणवणाऱ्या नंबरवरून खरा वाटणारा फोन आला, किंवा कुणीतरी तुमच्या क्लाउड अकाउंटचा पासवर्ड आजमावून बघितला — तर तुमचं वॉलेट तग धरेल का? दहा मुद्दे आहेत. ज्यावर खूण करता येत नाही, तेच तुमचं काम.

खूण फक्त तुमच्याच ब्राउझरमध्ये राहते; काहीही कुठे पाठवलं जात नाही, पान रिफ्रेश केलं की सगळं पुसलं जातं.

क्रिप्टो मालमत्ता (VDA) आणि NFT यांच्यावर कोणतंही नियमन नाही आणि त्यात प्रचंड जोखीम असू शकते. अशा व्यवहारांत पैसे बुडाले, तर कोणत्याही नियामकाकडून भरपाई किंवा दाद मिळण्याची सोय नाही.
खूण करायला सुरुवात करा, निकाल इथे लगेच दिसेल.

या निकालाचं करायचं काय?

एका बैठकीत दहापैकी दहा करायचा अट्टहास नको. आधी वरचे तीन — रिकव्हरी पासवर्ड, क्लाउड बॅकअप, आणि त्या क्लाउड अकाउंटचं टू-स्टेप व्हेरिफिकेशन. Keyless वॉलेटमध्ये खरा कणा तेवढाच आहे; मागचं तत्त्व सीड फ्रेज नाही, मग बॅकअप कशाचा मध्ये सविस्तर आहे. त्यानंतर बायनान्स अकाउंटचं 2FA आणि अँटी-फिशिंग कोड. उरलेले मुद्दे सवयीचे — ते हळूहळू अंगवळणी पडतात.

दोन प्रसंग डोळ्यासमोर आणा

पहिला: मोबाइल आत्ता या क्षणी गेला. लोकलमध्ये खिशातून, किंवा पावसात भिजून — कारण काहीही असो, तो परत मिळणार नाही असं धरा. आता स्वतःला विचारा: नव्या फोनवर बायनान्स अकाउंट पुन्हा उघडेल का, आणि 2FA ची बॅकअप की कुठे ठेवली आहे? वॉलेट परत आणण्यासाठी लागणारा क्लाउड बॅकअप आणि रिकव्हरी पासवर्ड — दोन्ही हातात येतील का? जिथे अडखळलात, तीच वरच्या यादीत खूण न झालेली ओळ. कोणत्याही स्कोअरपेक्षा हे जास्त स्वच्छ सांगतं.

दुसरा: «कस्टमर केअर» चा मेसेज. Telegram वर एक ग्रुप ॲडमिन, किंवा गूगलवर वरती दिसलेल्या नंबरवरून आलेला फोन. समोरचा माणूस सांगतो — तुमच्या वॉलेटवर धोका आहे, हे «सुरक्षा अपडेट» लिंक उघडा आणि पडताळणीसाठी रिकव्हरी पासवर्ड टाका. आवाजात घाई असते, कधी हिंदी-मराठी दोन्ही बोलतो, आणि तुमचं नावही माहीत असतं. या क्षणी क्षणभरही न थांबता «बायनान्स मला असा मेसेज करत नाही आणि रिकव्हरी पासवर्ड फक्त अधिकृत रिकव्हरी प्रक्रियेतच लागतो» हे तोंडावर आलं, तर सवयीचा भाग पास. एक सेकंद जरी घुटमळलात, तर वॉलेट सुरक्षेच्या सवयी पुन्हा एकदा वाचा.

ही यादी काय तपासत नाही?

दोन गोष्टी इथे पकडल्या जात नाहीत. एक म्हणजे तुमच्या ऑन-चेन अप्रूव्हलची आजची खरी स्थिती — ती ब्लॉक एक्सप्लोररवरच बघावी लागते, त्यासाठी अप्रूव्हल तपासणीच्या पायऱ्या वापरा. दुसरी म्हणजे बायनान्स अकाउंटमधली सेटिंग खरोखर लागू झाली आहेत का — यादी फक्त «केलंत का» विचारते, «नीट झालं का» हे ॲपमध्ये जाऊनच बघावं लागतं. ही तपासणी म्हणजे आठवण करून देणारी चिठ्ठी, विमा नव्हे.